Wednesday, 1 October 2014

सी- वोटर सर्व्हेत शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, तर आघाडी, युती तुटीने मनसेही फायद्यात

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ सर्व्हे हाती येत आहेत. तसाच एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. सी-वोटरने केलेल्या सर्व्हेत युती आणि आघाडी तुटल्याचा सर्वाधिक फायदा मनसेला होत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
 
सी-वोटर या निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने केलेल्या जनमत चाचणीनुसार, शिवसेना-भाजप यांची युती तुटण्याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार असून, आघाडी तुटण्याचा फायदा मात्र आघाडीतील दोन्ही पक्षांना होणार आहे.
 
भाजप सर्वात मोठा पक्ष ?
 
सी-वोटरने आज जाहीर केलेल्या जनमत चाचणीनुसार, या निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला येण्याची शक्यता आहे. सी-वोटरच्या सर्वेक्षणात भाजपला तब्बल 93 जागा देण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला 59 जागा मिळतील असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
 
युती असती तर फायद्याची शक्यता
 
शिवसेना-भाजप यांच्यात गेल्या 25 वर्षांपासून असलेली मैत्री संपण्याचा फटका खऱ्या अर्थाने भाजप-सेनेला बसत आहे. कारण हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर त्यांना 186 जागा मिळतील, असा अंदाज सी-वोटरच्या यापूर्वीच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला होता. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मैत्री संपुष्टात आल्यानंतर एक सर्वे करण्यात आला. यामध्ये आता भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मिळून 152 जागा मिळू शकतात. म्हणजेच युती तुटल्यामुळे 34 जागा शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांना गमवाव्या लागणार आहेत.
 
आघाडी तुटल्याचा फायदा कोणाला?
 
सी- वोटरच्या सर्वेक्षणात काँग्रेसला 40, राष्ट्रवादीला 47 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांमधील 15 वर्षांपासून असलेली आघाडी तुटण्यापूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 72 जागा मिळतील असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे 87 जागांवर त्यांना विजय मिळणार आहे, म्हणजेच आघाडी तुटल्याचा फायदा होत आहे, जागांच्या हिशेबात हा फायदा तब्बल 15 जागांचा आहे.
 
सर्वाधिक फायदा राज ठाकरेंना
 
शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील समझोता संपुष्टात आल्याचा सर्वात जास्त फायदा राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळत आहे. कारण मनसेला यावेळी तब्बल 27 जागांवर यश मिळेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.
 
अपक्ष आणि अन्य पक्षांना मिळून 22 जागा मिळतील, असा अंदाजही या सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे.
 
मॅजिग फिगर
 
निवडणूक निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 145 जागा मिळणार नसल्याने निवडणुकीनंतरची आघाडी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरीही त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक 145 जागांची मॅजिक फिगर गाठता येणार नाही. मात्र शिवसेना भाजप हे गेली 25 वर्षे एकत्र असलेले आणि काही दिवसांपूर्वीच वेगळे झालेले पक्ष एकत्र आले तर मात्र त्यांना सरकार स्थापनेसाठी आवश्यक 145 हा आकडा सहज गाठता येईल.
 
भाजप-राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन पक्ष एकत्रित येतील की नाही हे सांगता येणं अशक्य असलं तरी त्यांना मिळणाऱ्या जागांची बेरीज केल्यास त्यांनाही बहुमतातील सरकार स्थापन करता येऊ शकेल.

No comments:

Post a Comment