अहमदाबाद: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी शिवसेना – भाजप युती तुटीवर नाराजी दर्शवली आहे. युती तुटली नसती, तर मला आनंद झाला असता, असं अडवाणी म्हणाले. याशिवाय त्यांनी भाजपला आपल्या जबाबदारीची जाणीवही करून दिली आहे.
“एनडीएतील मित्रपक्ष राज्यांमध्ये शक्तीशाली आहेत. त्यामुळे राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तास्थापन करु शकतात, तर केंद्रात सत्तास्थापनेची जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आपली जबाबदारी ओळखूनच काम करावं", अशा शब्दात लालकृष्ण आडवाणी यांनी भाजप नेत्यांना सुनावलं आहे.
स्वच्छता अभियानानिमित्त आडवाणी गुरुवारी अहमदाबादमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंचा फोन
शिवसेना-भाजपची युती तुटू नये, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करुन मध्यस्थीची विनंतीही केली होती असंही अडवाणींनी सांगितलं. इतकंच नाही तर त्यानंतर आपण नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून युतीविषयी विचारपूस केल्याचंही अडवाणी म्हणाले.
मात्र भाजप-सेनेची युती तुटल्यामुळं महाराष्ट्रात भाजपची ताकद कमी झालीय, असं म्हणता येणार नाही अशी सावध प्रतिक्रियाही अडवाणींनी दिली आहे.
युती तुटली नसती तर आनंद
'महाराष्ट्रात युती तुटली नसती तर मला आनंदच झाला असता. आमच्या पक्षातील अनेक नेते जागावाटपावरुन नाराज होते. भाजपला जास्त जागा द्यायला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. याविषयी मला जास्त काही माहिती नाही. मात्र एनडीएतील मित्रपक्ष हे राज्यपातळीवरील पक्ष असल्याने, राज्यात तेच शक्तीशाली आहेत, असं आडवाणींनी नमूद केलं.
संबंधित बातम्या
No comments:
Post a Comment