Sunday, 28 September 2014

केंद्र सरकारने लावला उसनवारीला चाप

नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारला विविध विकासकामांसाठी उसन्या घ्याव्या लागणाऱ्या पैशांचा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यक्त केला होता. त्यापेक्षा 8 हजार कोटी रुपये कमी उसनवारी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 

सबसिडी किंवा अंशदानाच्या रूपाने खर्च होणाऱ्या पैशाला सरकारने काही प्रमाणात आळा घातला असल्यामुळे देशाची राजकोषीय स्थिती चांगली झाली आहे. यास्तव सरकारला उसनवारीला चाप लावणे शक्‍य होत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीचे उसनवारी वेळापत्रक रिझर्व्ह बॅंक व केंद्र सरकार यांनी नुकतेच तयार केले. यामध्ये भागांच्या पुनर्खरेदीचे वेळापत्रकही तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सरकारला 6 लाख कोटी रुपयांची उसनवारी करावी लागेल, असे केंद्रीय अर्थसंकल्पात म्हटले होते.

प्रत्यक्षात 5.92 लाख कोटी रुपये उसनवारी करावी लागणार आहे. त्यापैकी दुसऱ्या सहामाहीत 2.40 लाख कोटी रुपये उसनवारी सरकार करेल, त्यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षातील उसनवारी यंदा 8 हजार कोटी रुपयांनी कमी असणार आहे. 

यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत सरकार बाजारातून पैसा उचलणार नाही. याचाच अर्थ मुदत संपणारी ट्रेझरी बिले बाजारातून काढून न घेता पुन्हा एकदा बाजारात वाढीव मुदतीवर ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती अर्थ खात्याचे सचिव अरविंद मायाराम यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment