Sunday, 28 September 2014

शिवसेनेत इनकमिंग-आऊटगोईंग सुरूच

मुंबई - शिवसेना-भाजपची युती आणि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी मोडल्यानंतर महाराष्ट्रातले राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सर्वच पक्षींना 288 उमेदवारांची शोधाशोध करताना राजकीय गणिते बदलू लागली आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शिवसेनेतही इनकमिंग-आऊटगोइंग सुरू झाले आहे. शिवसेनेला ठाणे, नागपूर, मुंबईत आऊटगोईंगचा फटका बसला आहे. 

ठाण्यात शिवसेनेचे नेते अनंत तरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बंडखोरी केलीय. माजी आमदार असलेल्या तरेंनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपने अचानकपणे तरे यांना तिकीट दिले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावत भाजपने ठाणे जिल्ह्यात कमळ फुलवण्याचे मनसुबे रचले आहेत. उपनेते अनंत तरे यांना कोपरी पाचपाखाडी, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण ग्रामीण आणि युवा सेनेचे वैभव नाईक यांना भाजपने गळाला लावत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सेनेने वैभव नाईक यांची तात्काळ हकालपट्टी केली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचाराच्या शुभारंभावेळी सर्व बंडखोरांना आपल्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन केले आहे. मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मनसेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी मनसेची वाट धरली. त्यामुळे राऊळ यांनी विनोद घोसाळकर यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर कोल्हापूरचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश साळोखे यांनीसुद्धा मनसेत प्रवेश केला आहे. याशिवाय सुभाष वानखेडे, चंद्रकांत खाडे, प्रताप मेहेरोलिया भाजपात प्रवेश, तर काशिनाथ मेंगाळ यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार पडलेय. राजू शेट्टींचे कट्टर समर्थक उल्हास पाटील शिवसेनेत दाखल झालेत. शिरोळमधून उल्हास पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. कोकणात रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे राज्यमंत्री राहिलेले उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शुक्रवारी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि रत्नागिरीची उमेदवारी मिळवली. सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने अचानक कॉंग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांचे बंधू अजिंक्‍य पाटील यांना थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच कराड दक्षिण मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. याशिवाय मुंबईत कॉंग्रेसचे कृष्णकुमार शुक्‍ल, अशोक मिश्रा आणि राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांचे सेनेत स्वागत झाले आहे.

No comments:

Post a Comment