Friday, 26 September 2014

सगळ्यांचेच ‘घट’ स्वबळावर

मुंबई - विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना ‘स्वबळाची उबळ’ राज्यातील प्रमुख चारही राजकीय पक्षांना आली. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर युतीतील आणि आघाडीतील पक्षांनी आपापल्या घटकपक्षांशी काडीमोड घेण्याचा निर्णय आज घेतला. त्याचबरोबर राज्याची ‘ब्लू प्रिंट’ आजच सादर करणाऱ्या मनसेनेही दंड थोपटल्याने आता बहुतांश ठिकाणी किमान पंचरंगी लढती होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. युतीची गेल्या तीन दशकांची व आघाडीची १५ वर्षांची मैत्री तुटल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील सरकारमधून बाहेर पडली असून, दुसरीकडे  शिवसेनाही केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. 

‘शिवसेनेने जागावाटप चर्चा केवळ मुख्यमंत्री पदाभोवती केंद्रित केली होती. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आघाडी सरकारला खाली खेचण्याचे मुख्य उद्दिष्ट त्यामुळे मागे पडणार असल्याने आमचा मार्ग आम्ही स्वीकारला,’’ असे भाजप नेत्यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून आम्ही हा निर्णय कळवला असल्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. 

‘२५ वर्षांची वैचारिक युती संपुष्टात आणताना त्रास होतो आहे. शिवसेनेबाबत प्रचारात एकही अपशब्द वापरला जाणार नाही,’’ असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नसून २७ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेतच ते वक्‍तव्य करतील असे सांगण्यात आले. शिवसेना खासदारांनी मात्र लोकसभा निवडणूक निकालानंतरच भाजपने हा निर्णय घेतला होता, येथपासून तर राष्ट्रवादीशी छुपी युती करण्याचा भाजपचा उद्देश आहे, असे आरोप केले आहेत.

भाजपच्या या निर्णयाची घोषणा झाल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर ता. २७ रोजी होणार असल्याचे शिवसेनेने माध्यमांना कळविले. 

घटकपक्षांची पळवापळवी 
संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या घडामोडीत महायुतीत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांची पळवापळवी सुरू होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे राजकारणात आलेले महादेव जानकर अचानक शिवसेनेच्या बाजूने बोलू लागल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, सायंकाळी ते भाजपमध्ये परतले. युती संपुष्टात आल्याची घोषणा झाली तेव्हा जानकर हे घटक पक्षातले एकमेव नेते हजर होते. राजू शेट्‌टी यांनी युती संपुष्टात येणे दुर्दैवी आहे, आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून याबद्दलची भूमिका स्पष्ट करू असे सांगितले. रामदास आठवले यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी विनोद तावडे यांनी स्वीकारली आहे. आठवले यांनी वारंवार मंत्रिमंडळात समावेश व्हावा अशी इच्छा बोलून दाखवली आहे. महाराष्ट्रातील दलित मतांची संख्या लक्षात घेता दोघेही आठवले यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करतील हे उघड आहे.

महायुती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. दर वेळी शिवसेनेकडून जागावाटपाचा फार्म्युला वेगवेगळ्या स्वरूपात देण्यात आला. त्यामुळे जागावाटपातील चर्चेत अडथळा निर्माण झाला. आम्हाला नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला.
- देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष

त्यांचे बुरे दिन असतानाही विनाशर्त शिवसेना भाजपच्या पाठीशी उभी राहिली. २५ वर्षे जुन्या सहकाऱ्यापासून मार्ग वेगळे करण्याच्या भाजपच्या निर्णयाने खूप दुःख झाले. माझ्यासह शिवसेना- भाजपमधील अनेकांसाठी ही फक्त युती नव्हती, ते कुटुंब होते. या युतीने अनेक चढ-उतार पाहिले आणि त्याला एकत्र सामोरेही गेलो. चर्चेमधील एक अडथळा पार झाल्यावर दुसरा अडथळा आला.
- आदित्य ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष

आघाडीचाही घटस्फोट
महायुतीचा घटस्फोट झाल्यानंतर दोन तासांतच राष्ट्रवादीने काँग्रेस सोबत काडीमोड घेतला. आज घटस्थापनेच्या दिवशीच आघाडी आणि महायुतीत ‘घटस्फोट’ झाल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. काँग्रेसने आघाडीसाठी कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, असा आरोप करत राष्ट्रवादीने आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. राष्ट्रवादी भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी एकत्रितपणे ही घोषणा केली. काँग्रेस सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रवादी निवडणुका लढवेल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. तर, राष्ट्रवादी आघाडी सरकारमधून आजच बाहेर पडणार असल्याचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते अजित पवार यांनी जाहीर केले. काँग्रेससोबत आघाडी तोडल्यानंतर अजित पवार थेट राजभवनवर गेले. राज्यपालांना त्यांनी आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी बाहेर पडत असल्याचे पत्र दिले. 

सतत पंधरा वर्षे राज्यात काँग्रेससोबत केवळ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीने जबाबदारीने सोबत केली. राष्ट्रवादीच्या अधिक जागा असतानाही २००४ मधे राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपद दिले. मात्र, या वेळी लोकसभेत राष्ट्रवादीच्या दुप्पट जागा असतानाही काँग्रेसने विधानसभेच्या १४४ जागा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यास प्रतिसाद दिला नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. पण, त्यानंतर दोन महिने उलटूनही काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही. जागावाटपाची बोलणी अपूर्ण असतानाही काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी विश्‍वासात न घेता जाहीर केली. यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याचा निर्णय घेतल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. 

मागील दोन दिवस आघाडीच्या चर्चेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतानाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाडला निघून गेले, असा आरोप करत काँग्रेसने आघाडीसाठी पोषक प्रतिसाद दिला नसल्याने राष्ट्रवादी नाईलाजास्तव स्वबळावर जाण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा त्यांनी केली. 

‘सकाळ’ने मांडली होती स्वबळाची भूमिका
राज्यातील चारही प्रमुख पक्षांनी युती किंवा आघाडी करण्याऐवजी स्वतंत्रपणे लढावे, अशी भूमिका ‘सकाळ’ने गेल्याच आठवड्यात मांडली होती. राज्य प्रशासनातील निर्णयक्षमता गतिमान होण्यासाठी आघाड्यांचे सरकार अडचणीचे ठरत असल्याचे दिसून येत होते. प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास मतदारांनाही प्रत्येक पक्षाचे स्वतंत्रपणे मूल्यमापन करण्याची संधी मिळेल, असे मत ‘सकाळ’ने व्यक्त केले होते. ‘सकाळ’च्या भूमिकेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. आपल्या मनातलाच विचार ‘सकाळ’ने मांडल्याची भावना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राज्यभरातल्या विचारवंतांनी आणि सामान्य नागरिकांनीही मांडली होती.

No comments:

Post a Comment