Sunday, 28 September 2014

भारताच्या विकासासाठी साथ द्या -मोदी

न्यूयॉर्क - "मातृभूमीच्या विकासासाठी साथ द्या. मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारताशी जोडून घ्या,‘‘ असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

येथील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे सुमारे 20 हजार अनिवासी भारतीय आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून भाषण ऐकणारे हजारो जण नरेंद्र मोदी यांच्या उत्स्फूर्त भाषणामुळे मंत्रमुग्ध झाले. मॅडिसन स्क्वेअर येथील वातावरण तर पूर्णतः मोदीमय झाले होते. कार्यक्रमस्थळी मोदींचे आगमन होण्यापूर्वी "मोदी मोदी..‘, "हर हर मोदी...‘, "भारतमाता की जय‘ अशा घोषणांनी मॅडिसन स्क्वेअर दुमदुमून गेले होते. "ते आले... ते बोलले आणि त्यांनी जिंकले‘ अशी काहीशी स्थिती उपस्थितांची झाली होती. मोदी यांनी फिरत्या रंगमंचावर उभे राहून भाषण केले. हा रंगमंच दर 15 मिनिटांनी 360 अंशांतून फिरत होता. त्यामुळे चारही बाजूंनी बसलेल्या सर्वांशी त्यांना संवाद साधता आला. या भाषणाला अमेरिकी कॉंग्रेसचे अनेक सदस्यही उपस्थित होते.

सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ केलेल्या भाषणाची सुरवात मोदी यांनी "भारतमाता की जय‘ या घोषणेने आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन केली. संपूर्ण भाषण त्यांनी हिंदीतच केले.

"भारत हा तरुणांचा देश आहे. म्हणूनच ही सामर्थ्यांची खाण आहे. या तरुणांनी एका निश्‍चित ध्येयाने वाटचाल केल्यास भारताची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. एकविसावे शतक हे भारताचेच असेल,‘‘ असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला. ""सध्याच्या तरुण पिढीवर सर्वांचे लक्ष आहे. जगाकडे नसलेल्या तीन गोष्टी भारताकडे आहेत आणि त्या म्हणजे "डेमोक्रसी, डेमोग्राफिक डिव्हिडंट आणि डिमांड.‘ आपले सरकार जनतेच्या आशाआकांक्षा 100 टक्के पूर्ण करेल, असा मला विश्‍वास वाटतो.‘‘

मोदी यांनी अमेरिकेच्या लोकशाहीचाही गौरव केला. ते म्हणाले, ""अमेरिका ही जगातील सर्वांत पुरातन लोकशाही आहे. तर भारत हा जगातील सर्वांत लोकशाही प्रधान देश आहे. अमेरिकेच्या कानाकोपऱ्यात जगभरातील लोक पसरले आहेत. तर भारतीय जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत. हाच दोन्ही राष्ट्रांना जोडणार दुवा आहे.‘‘ "भारताने सुशिक्षित मनुष्यबळ जगाला निर्यात करावे. आज सर्वाधिक तरुण हे आपल्या देशामध्ये आहेत. जगभरात सर्वत्र कुशल मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. चांगले शिक्षक आणि चांगल्या परिचारिकांची सर्वच देशांना गरज भासते. भारत ही गरज पूर्ण करू शकतो. 

तुम्हालाही कधीतरी आपल्या माता-पित्यांना गंगा स्नानासाठी आणण्याची इच्छा आहे. ती गंगा स्वच्छ असावी असे वाटत नाही का, असे भावनिक आवाहन करून अनिवासी भारतीयांनी "नमामी गंगे‘ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मोदी म्हणाले... 
- तुम्हाला लाज वाटेल असे कोणतेही काम करणार नाही
- आमचे पूर्वज सापांशी खेळत होते, आम्ही संगणकाच्या "माऊस‘शी खेळतो.
- भारतातील 65 टक्‍क्‍यांहून अधिक लोकसंया 35 वयोगटाच्या आतील आहे. हीच भारताची ताकद
- महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्याचे जनआंदोलन उभारले. आज विकासाला जनआंदोलनाचा रुप देणे गरजेचे
- पूर्वीचे सरकार कायदे करण्यावर भर देत होते. मी जुने कायदे संपविण्याचे का सुरू केले.
- "मेक इन इंडिया‘साठी अनिवासी भारतीयांनी योगदान द्यावे
- गंगा शुद्धीकरणात तुमचा सहभाग हवा
- गांधीजींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या दिडशेव्या जयंती दिनी आपण "स्वच्छ भारता‘ची भेट देऊ
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव होत असताना 2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न
- यावेळी "प्रवासी भारत दिन‘ अहमदाबादमध्ये
- "पीआयओ‘ कार्ड असणाऱ्यांना आजीवन व्हिसा देणार
- अमेरिकी पर्यंटकांसाठी "व्हिसा ऑन अरायव्हल‘ योजना लवकरच

20 लाख डॉलर गोळा 
नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी "इंडिया अमेरिकन सोसायटी‘ला 15 लाख अमेरिकी डॉलरची गरज होती. संयोजकांनी 20 लाख डॉलर गोळा केले. उर्वरित रक्कम देणगी स्वरुपात देण्यात येईल, असे "इंडियन अमेरिकन कम्युनिटी फाऊंडेशन‘चे अध्यक्ष भारत बरई यांनी सांगितले.

100 बोहरा मुस्लिम उपस्थित 
यांच्या कार्यक्रमाला बोहरा मुस्लिम समाजातील 100 जण उपस्थित होते. त्यांच्या पारंपरिक पोषाखात हे सर्वजण आले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत 
नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक गरवा नृत्याने या कार्यक्रमांची सुरवात झाली. प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आणि ज्येष्ठ व्हायोलिन वादक एल. सुब्रह्मण्यम यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. एका कलाकाराने मोदींचे "पोर्टेट‘ साकारले. मोदींचे भाषण सुरू होण्यापूर्वी कविता कृष्णमूर्ती यांनी राष्ट्रगीताचे गायन केले.

राजदीप सरदेसाईंना धक्काबुक्की 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे कार्यक्रम सुरू होण्याआधी काही तास आधी पत्रकार व टीव्ही अँकर राजदीप सरदेसाई यांना कार्यक्रम स्थळाबाहेर धक्काबुक्की झाली. "मेडिसन स्क्वेअर गार्डन बाहेर प्रचंड गर्दी आहे. काही मूर्खांना मात्र शिवीगाळ करणे शौर्याचे लक्षण मानतात,‘ असे ट्विट या प्रसंगानंतर सरदेसाई यांनी केले. यापूर्वी मोदींवर केलेल्या टीकेमुळे ही धक्काबुकी करण्यात आल्याचे बोलले जाते.

No comments:

Post a Comment