Tuesday, 30 September 2014

जयललितांच्या जामिनावरील सुनावणी लांबणीवर

बंगळूर : 66.65 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अटकेत असलेल्या तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी 6 ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. जयललिता आणि त्यांचे तीन सहकारी एन. शशिकला, जे. इलावरसी आणि व्ही. एन. सुधाकरन यांना शनिवारी विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर सोमवारी त्यांनी शिक्षेविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  

जयललिता यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करत शिक्षेविरोधात दाद मागत, जामिनासाठी अर्ज केला होता. उच्च न्यायालयात जयललिता यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ज्ञ राम जेठमलानी यांनी मांडली. उच्च न्यायालयाने आज त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी राखून ठेवत 6 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी होईल, असे सांगितले. जयललिता यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागल्यानंतर त्यांची जागी अण्णाद्रमुकचे ओ. पन्नीरसेल्वम यांनी घेतली आहे.
जॉन मायकेल डिकुन्हा यांच्या न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षांची शिक्षा, 100 कोटी रुपयांचा दंड आणि अन्य दोषींना प्रत्येकी 10 कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. दंड न भरल्यास या सर्वांच्या शिक्षेत आणखी एक वर्षाची वाढ करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. जयललिता यांना आता सहा वर्षांसाठी निवडणूक लढविता येणार नाही. जयललिता यांना शिक्षा झाल्यानंतर अण्णाद्रमुकच्या समर्थकांनी तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी निदर्शने केली

No comments:

Post a Comment