राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा काटा काढण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कराड दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विलासकाका उंडाळकर यांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कॉंग्रेसने तिकीट कापल्यामुळे विलासकाका उंडाळकर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्यांच्या तिकीटावर येथून निवडणूक लढविण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता कराड दक्षिण तालुक्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ मोहिते यांनी पत्रकार परिषद बोलावली असून, यावेळी यासंदर्भात काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
विलासकाका उंडाळकर यांनी सलग सातवेळा कॉंग्रेसच्या तिकीटावर कराड दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी येथून निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे विलासकाका उंडाळकर काय करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. कॉंग्रेससोबतची युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीने आता पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्याच मतदारसंघात मात देण्यासाठी रणनिती आखली असून, त्याचाच एक भाग म्हणून या मतदारसंघातून विलासकाका उंडाळकर यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसमधील नाराज झालेल्या डॉ. अतुल भोसले यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांना भाजपकडून याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून कराडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राजेंद्र यादव हे कॉंग्रेसमधील पृथ्वीराज चव्हाण यांचे एकेकाळी समर्थक होते. मात्र, कराड नगपालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चव्हाण आणि त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यांनाच या मतदारसंघातून शिवसेना रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment